मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सत्ता स्थापन करुन वीस दिवस उलटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे हा विस्तार रखडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता त्यापूर्वी येत्या शनिवारी (२३ जुलै) भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे.
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार, दि. २३ जुलै रोजी पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिली.
उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजपा प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी जी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध मोर्चा – आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य असे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित राहतील. बैठकीचे उद्घाटन मा. प्रदेशाध्यक्षांच्या संबोधनाने होईल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप होईल.
त्यांनी सांगितले की, बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष मा. सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळविल्याबद्दल मा. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजपा – शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील. शेतीविषयक प्रस्ताव भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत राजकीय सद्यस्थितीविषयी चर्चा होईल तसेच आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
BJP Maharashtra Leaders Meet Before Cabinet Expansion