मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर हे बोगस ‘मजूर’ असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची ‘मजूर’ असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक केल्याप्रकरणी दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सहकार विभागाचे सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांना बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने दिली. त्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रवीण दरेकर यांना कागदोपत्री मजूर दाखविण्याच आले आणि ते मुंबई बँकेचे अध्यक्षही होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व त्यांच्या साथीदारांनी जवळपास २ हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा व अनेक नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवालात तसेच चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे.
गेली २० वर्षे मजूर नसतानाही मजूर असल्याचे खोटे भासवून दरेकर हे मुंबई बँकेवर संचालक/अध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत. या २० वर्षात मुंबई बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे, झाले असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा १९६० च्या कलम ८९ अ अंतर्गत चौकशी करून अहवाल दिलेले आहेत. २०१५ पासून ‘नाबार्ड’च्या प्रत्येक अहवालात मुंबई बँकेतील अनियमितता व घोटाळ्यांवर ठपका ठेवलेला आहे. २०१३ साली सहकार विभागाने ८९ अ अंतर्गत केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने मुंबई बँकेची व ठेवीदारांची फसवणूक केल्याचे, विश्वासघात केल्याचे स्पष्टपणे नमूद केले तसेच कारवाईची शिफारस केली आहे. मात्र २०१३च्या या अहवालावर सहकार विभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके'चे श्रीमंत, कागदोपत्री मजूर भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर मुंबई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आम आदमी पार्टीला यश !!
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य सचिव,
आप महाराष्ट्र. @Dhananjay4AAP— AAP महाराष्ट्र (@AAPMaharashtra) March 15, 2022
२०२० मध्ये सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे यांनी ८९अ खाली चौकशी करून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे असल्याचा अहवाल सादर केला. तसेच सहकार कायदा कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश जारी केले. यामुळे नेमके कोणी घोटाळे केले याची जबाबदारी निश्चित होणार आहे. याशिवाय सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक (वर्ग१) मा. निलेश नाईक यांनी मुंबई बँकेचे चाचणी लेखापरिक्षण अहवाल तयार करून सहकार विभागाला सादर केला. या अहवालाचा आढावा घेतल्यास जवळपास २०१४-१५ ते २०१९-२०या काळात मुंबई बँकेत २००० कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे व अनियमितता झाल्याचे दिसून येते. या कालावधीत फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच चंद्रकांत पाटील हे सहकार मंत्री होते. याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने पोलीसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
आपचे सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे की, दरेकर यांची ज्या ‘प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे’त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे ‘रंगारी’ मजूर असल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा बराच रंग (चुना) त्यांनी गेले अनेक वर्ष मुंबई बँकेला लावला आहे. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली, किती मजुरी यासाठी त्यांना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.