इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरात लव्ह जिहादचा प्रश्न खूपच गाजत असून या संदर्भात आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. त्यातच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील याबाबत आपले मत मांडले आहे, आता त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह काही राज्यात लव्ह जिहादचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्याच भाजपाची याविरोधातील भूमिका ही कठोर राहिलेली आहे. असे असताना पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहादवर प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भाजपचे सर्वच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते पदाधिकारी देशभरात दौरे करत आहेत, माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या पर्यंत मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. जबलपुरमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी लव्ह जिहादचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रेम हे प्रेम असते, त्यात कोणतीही भिंत असता कामा नये, असे देखील त्या म्हणाल्या.
धर्मांतराच्या कटाच्या नावाखाली काही मंडळी आंतरधर्मीय विवाहाला विरोध करत आहेत, असे विचारले असता त्या म्हणल्या की, प्रेम कोणत्याही बंधनांना मानत नाही. जर दोन व्यक्ती प्रेमामुळे सोबत राहत असतील, तर त्याचा पूर्णपणे आदर करायला हवा. परंतू, त्याच वेळी जर एखाद्या महिलेला आंतरजातीय विवाहात अडकविले जात असेल, फसविले जात असेल तर या मुद्द्याला वेगळ्या पद्धतीने पहायला हवे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
योजनेचे कौतुक
मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू झाली आहे. १ कोटी २५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १ हजार रुपये जमा होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. सर्व जिल्हा, गाव आणि प्रभाग स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये मंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी सहभागी होत आहेत. या योजनेमुळे सर्वांच्या खात्यात दर महिन्याला एक हजार रुपये जमा होतील. यासाठी बँक खाती आधार आणि समग्र आयडीशी लिंक करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. यामध्ये आपला पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा दावा पंकजा यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ‘लाडली बहना योजनेचे कौतुक केले.
BJP Leader Pankaja Munde on Love Jihad