मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या दोन्ही भगिनी भाजपमध्ये खुष नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही भगिनींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आल्या होत्या. या कार्यक्रमाला भाजपच्या कुठलाही नेत्याने हजेरी लावली नाही. त्यामुळे सध्या चर्चांना जोर आला आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपने राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे, तर त्यांची बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत. शरद पवार यांनी प्रभादेवी येथील सभागृहात रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन केले आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी या नेत्रालयाची स्थापना केली आहे. पंकजा आणि प्रीतम मुंडे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, धनंजय मुंडेही उपस्थित होते. धनंजय हे देखील मुंडे घराण्यातीलच आहेत. पंकजा आणि प्रीतम मुंडे यांचे ते चुलत बंधू आहेत. त्यात काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखही हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “डॉ. लहाने वंजारी समाजातून येतात, जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रभावशाली समुदाय आहे. मुंडे हे देखील याच समाजाचे असून हा त्यांच्यातील समान दुवा आहे. याशिवाय लहाने हे बीडच्या शेजारी असलेल्या लातूर जिल्ह्यातील आहेत. याशिवाय लहाने यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशीही चांगले संबंध होते. मुंडे भगिनींचे या कार्यक्रमात असणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर असणे ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन गोष्ट नाही. यापूर्वी २०१६ मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी मुंडे भगिनी गेल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा आणि प्रीतम मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे महाराष्ट्र भाजप नेतृत्वाशी मतभेद असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यात प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. असे न झाल्याने या दोघांनी मुंबईत ताकद दाखवली. प्रीतम मुंडे यांच्या जागी राज्यसभा खासदार भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आल्याचे सांगण्यात आले. कराड हे मुंडे भगिनींचे वडील गोपीनाथ मुंडे यांचेही निकटचे नेते राहिले आहेत.
डॉ. लहाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून यापुढेही या नेत्रालयाच्या माध्यमातून असेच काम करीत राहतील, असा विश्वास उद्घाटनप्रसंगी श्री. पवार यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात डॉ. लहाने यांनी नेत्रशल्यचिकित्सक विषयात पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी केले.
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी, मानसिक आरोग्य, मधुमेह तपासणी करण्यात येत असून येणाऱ्या काळात डोळ्यांची तपासणी करण्यासाठीही डॉ. लहाने यांनी पुढाकार घ्यावा असे पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयामध्ये मोतीबिंदू, कॉर्निया, रेटिना, ऑक्युलोप्लास्टिया यासारख्या डोळ्यांच्या व्याधींवर उपचार केले जाणार आहेत.