मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील गोरेगावच्या सुमारे 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापेमारी केली आहे. राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान दाखल झाले. राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच राऊत यांची चौकशीही केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राऊत यांची कोंडी झाली आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार आले आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या खूपच सक्रिय झाले असे म्हटले जाते. महाविकास आघाडी मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील मंत्री, आमदार आणि खासदार यांना टार्गेट करीत त्यांचे कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागे एका मागून एक उघड करण्यास सोमय्या यांनी धडाका लावला. आणि त्या पाठोपाठ ईडीची चौकशी सुरू झाली. कथित नेत्यांची यादी करून चौकशी करण्यात येऊ लागली, असा आरोप विरोधकांकडून सतत होत आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या यादीतील पुढील नेता कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.
गेल्या एक-दीड महिन्यात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सुमारे 50 आमदारांना घेऊन मुख्यमंत्री पदवी विराजमान झाले. दरम्यानच्या काळात सोमय्या शांत होते, परंतु पुन्हा एकदा त्यांनी आता वेगवेगळ्या प्रकरणी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा घालीत चौकशी सुरू केली तर दुसरीकडे सोमय्या यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
संजय राऊत को हिसाब तो देना पड़ेगा pic.twitter.com/r5bPETWsV6
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) July 31, 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच कोठडीत असावी अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे, असे सोमय्या म्हणाले. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असेही सोमय्या म्हणाले. संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केलं होते, पत्राचाळमध्ये 1200 कोटींचा घोटाळा झाला. त्यासोबत नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचं आहे. पळापळ करत होते. हिशोब देत नव्हते. आता त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
या संदर्भात अधिक माहिती देताना सोमय्या म्हणाले की, पत्राचाळ प्रकरणी मीच मीडियाला पुरावे दिले आहे. जिथे तक्रारी केल्या. त्यांनाही पुरावे दिले. राऊतांच्या विदेशवाऱ्या व्हायच्या, कुटुंबासह परदेशात जायचे. विमानाचे तिकीट, हॉटेलची बिले कोण देत होते? प्रवीण राऊत आणि बाकीच्यांचे संबंध कशा प्रकारे आहेत? हिशोब तर द्यावेच लागतात, असं सांगतानाच या प्रकरणी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
पत्राचाळ जमीन घोटाळा तब्बल 1,034 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात आता संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र प्राधिकरण अर्थात म्हाडाचा एक भूखंड होता. हा भूखंड विकसीत करण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या मालकीच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला होता. ठरलेला कराराप्रमाणे संबंधित कंपनीला या जागेवर तीन हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 हे भाडकरूंना तर उर्वरित फ्लॅट हे म्हाडा आणि कंपनी यांनी वाटून घ्यायचे होते.
या प्रकरणात प्रवीण राऊत यांनी पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात याला आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची आज चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार कराराचे पालन न करता आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने या चाळीचा काही भाग हा खासगी बिल्डरांना विकला आहे. सन 2011, 2012 आणि 2013 मध्ये या भूखंडाचे अनेक भाग हे खासगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊतांनी तपास यंत्रणांना काम करू दिलं पाहिजे. कर नाही, त्याला डर नाही. राऊत पत्रावाला चाळीची माहिती ईडीला देतील याचा विश्वास आहे. अनेक लोक आहेत जे राजकारणात नाही, त्यांचीही चौकशी झाली. भाजपवर ते आरोप करतात का? तपास यंत्रणांकडे काही माहिती असते तेव्हा ते अशा पद्धतीने कारवाई करतात, असे ते म्हणाले.
BJP Leader Kirit Somaiya on Sanjay Raut ED Raid