मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या या महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या घरी छापे टाकले. सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकल्याचे सांगितले जात आहे. हे छापे पडताच अडसूळ यांची तब्ब्येत बिघडली. हाच धागा पकडून सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर आसूड ओढला आहे. अडसूळ हे अटक होताच आजारी पडले मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आता कुणीच वाचवणार नाही. मी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास कोल्हापूरला जात आहे. माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सोमय्या हे उद्या (२८ सप्टेंबर) कोल्हापुरात पोलिस स्टेशनला जाऊन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, याप्रकरणी कसून चौकशी करावी आणि मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ते करणार आहेत.