नाशिक – राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आलेल्या आहेत. बँका टिकल्या तर त्यावर अवलंबून शेतकरी, व्यापारी आणि अनेक घटक विकास करु शकतील. जळगाव जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांसाठीच आम्ही (खडसे यांच्यासह सर्व) जळगावला एकत्र आलो आहेत. सर्व पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे बँकेची निवडणूक आम्ही बिनविरोध करू असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांचे मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाजन म्हणाले की, राज्य सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नाही त्याचा मोठा फटका समाजाला बसतो आहे. सरकार तुमचे असताना ही वेळ का आली? अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा समाजाला नको आणि अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसींना नको. हे नक्की काय चाललंय, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यावर ते म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत. अजून सरकारने कोणालाच मदत केली नाही. एक दमडीही फेकली नाही. शेतकरी संपुष्टात येत आहे. आणि उत्तर प्रदेशच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद करायचे. हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. व्यापारी कोरोनामुळे आधीच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र बंदच्या राजकीय हाकेला कोणी साथ देणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
खडसे काठावर पास होणारे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खूप बहुमत होते असे काही कधीच नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. त्यामुळे कुणाला दोष देऊन उपयोग नाही. खडसे कधी म्हणता की फडणवीसांमुळे ते निवडणुकीत हरले. कधी म्हणता माझ्यामुळे. दोन वर्षानंतर त्यांना कळलं की मी त्यांना पाडले. असे कसे, असा खोचक सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
१७-१८ नगरसेवक भाजपच्या वाटेवर
जळगाव महापालिकेतील अनेक नगरसेवक भाजपमध्ये परतणार आहेत. तशी या नगरसेवकांचीच इच्छा आहे. १७ ते १८ नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, त्यावर अजून विचार केलेला नाही, असे महाजन यांनी सांगितले.