मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायालय म्हटले की तारीख पे तारीख असे म्हटले जाते. साहजिकच अनेक खटले निकाली निघण्यास प्रचंड विलंब होतो. त्यातच राजकीय खटले तर आणखीनच लागतात. परंतु आता खुद्द न्यायालयानेच एक खटला तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे नेते तथा माजी मंत्री व विद्यमान गणेश नाईक यांच्यावर महिलेने लावलेल्या बलात्कारातील आरोपावर ट्रायल कोर्टाला तातडीने हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाला दिले.
नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात देखील गणेश नाईक यांच्या विरोधात कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ए समरी अहवाल सादर केल्याचे नवी मुंबई पोलिसांनी आज उच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार गणेश नाईक यांच्याविरुद्ध एका महिलेने बलात्कार, तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत नोंदवलेल्या कथित दोन गुन्ह्यांमध्ये तथ्य आढळले आहे. परंतु पुरावे सापडलेले नाहीत, असे नमूद करणारा समरी अहवाल सादर केल्याचे नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यानंतर ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले. नाईक यांच्या विरोधात तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक बलात्काराचा आणि दुसरा शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे एका प्रकरणात जुलै, तर दुसऱ्या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात ए समरी अहवाल सादर करण्यात आल्याचे सहायक सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, नाईक यांच्या विरोधातील दोन्ही प्रकरणांना राजकीय किनार आहे. तसेच कोणत्याही राजकीय व्यक्तिविरोधात दाखल गुन्हे विनाकारण प्रलंबित ठेवले जातात. नाईक यांच्याविरोधातील दोन्ही गुन्ह्यांत पोलिसांनी ए समरी अहवाल सादर केला आहे.
सदर ४२ वर्षीय तक्रारदार महिलेने केलेल्या दाव्यानुसार नाईक यांच्याशी तिचे १९९५ पासून संबंध होते आणि त्यांच्यासह ती लिव्ह-इनमध्ये राहत होती. त्यांना एक मुलगाही आहे. नंतर त्या दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. एकदा वाद झाल्यावर नाईक यांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि आपल्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील महिलेने केला. मग हे प्रकरण न्यायालयात गेले. कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही प्रकरणात नाईक यांना नोटीस बजावली आहे. परंतु त्यानंतर काहीच झालेले नाही, असे नाईक यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच कनिष्ठ न्यायालयाला दोन्ही प्रकरणे लवकर निकाली काढण्याची विनंती केली. ती मान्य करून दोन्ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाला दिले. आता या प्रकरणाची पुढे काय होणार याची सर्वांमध्ये चर्चा सुरु आहे.
BJP Leader Ganesh Naik Police Evidences Rape Case