मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकारण आणि सत्ता नाट्यात पडद्यामागून खेळी खेळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज प्रथमच उघडपणे काही पाऊल टाकले आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीवारी केल्यानंतर थोड्याचवेळा पूर्वी मुंबईत राजभवन गाठले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे काही नेतेही आहेत. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी राज्यातील सद्यस्थितीबद्दल चर्चा केली. तसेच, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी घ्यावी असे पत्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिले. याची दखल घेत राज्यापालांकडून लवकरच विशेष अधिवेशन बोलविले जाणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकारची बहुमत चाचणी होणार आहे.
सेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० हून अधिक समर्थक आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने आता आक्रमक धोरण स्विकारले आहे. जर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही तर हे सरकार कोसळेल. त्यानंतर राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाईल. शिंदे गटासोबत भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचे यापूर्वीपासूनच बोलले जात आहे.
BJP leader Devendra Fadanvis meet Governor Bhagat singh Koshyari Maharashtra Political Crisis