विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अमित शहा गायब असले की काहीतरी राजकीय हालचाली सुरू आहेत, असे समजावे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर ते शांत बसले असतील, असा विचार कुणी करीत असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर त्यांचे लक्ष आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीने भाजपच्या विरोधकांचे मनसुबे उंचावले आहेत. त्यामुळे भाजपदेखील पश्चिम बंगालमध्ये केलेली चुक उत्तर प्रदेशात करणार नाही. सध्या जरी उत्तर प्रदेशमधील निवडणुका पुढे असल्या तरीही महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांमधील राजकारण तापले आहे. भाजप दोन आघाड्यांवर काम करीत आहे.
यातील एक म्हणजे स्वतःचा पक्ष बळकट करणे. आणि दुसरे म्हणजे विरोधकांना कमजोर करणे. सोबतच ज्या ठिकाणी युतीच्या शक्यता आहेत, तिथे पुन्हा एकदा हात मिळवणे, यावरही भाजपचा जोर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उत्तरप्रदेशात डंका असल्याचे वरवर दिसत असले तरीही विरोधक सक्रीय झाले आहेत. त्यामुळे अमित शहांची चिंता वाढली आहे. सहयोगी पक्षांच्या ते संपर्कात आहेत आणि लवकरच मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा निर्णय घेण्याच्याही तयारीत आहेत.
कोरोनामुळे भाजपचे नुकसान
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भाजपचे चांगलेच नुकसान केले. देशातील लोकांचा राग केंद्र सरकारच्या विरोधात वाढविण्यासाठी दुसऱ्या लाटेने मोठे योगदान दिले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपला वेळ लागेल आणि त्यात पुन्हा एक निवडणुक आली तर भाजपलाच फटका बसणार आहे. त्यामुळे पक्ष बळकट करण्यावर जोर दिला जात आहे.
उद्धव-मोदी भेटीचे रहस्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या खासगी भेटीचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. परंतु, तिकडे युपीमध्ये जितिन प्रसादला भाजपने सोबत घेतले आणि इकडे मोदींनी उद्धव यांच्याशी अर्धातास चर्चा केली. यातून मोठ्या हालचालीचा अंदाज लावला जात आहे.