मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्यात एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांचे केवळ फोनवरून बोलणे झाल्याचेही सांगण्यात आले. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खडसे हे अमित शहांच्या भेटीसाठी तब्बल ३ तास बसून होते. तरीही शाह यांची भेट होऊ शकली नाही. याप्रसंगी भाजपच्या खासदार आणि खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यादेखील उपस्थित होत्या, असे कळते. किंबहुना शाह यांनीच ही भेट नाकारल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी ते नवी दिल्ली येथे गेले असता, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते शाह यांच्या कार्यालयात पोहोचले, मात्र त्यावेळी अमित शाह हे महत्त्वाच्या बैठकींमध्ये व्यस्त होते. परिणामी, खडसे यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. विशेष म्हणजे त्यांच्यासमवेत त्यांच्या सुनबाई व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यादेखील होत्या. खरे म्हणजे शाह यांनीच ही भेट नाकारल्याचे सांगण्यात येते.
महाजन पुढे म्हणाले की, मी, रक्षाताई खडसे यांना यासंदर्भात फोन केला असता, त्यांनीच मला याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मागील महिन्यात अमित शाह यांची भेट घेतली होती अशी चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू होती. मात्र प्रत्यक्ष भेट झाली नाही, तर फोनवरून फक्त बोलणे झाले, असा खुलासा खडसे यांनी केला होता. फोनवर कशाबद्दल चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नव्हते. त्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
आता पुन्हा खडसे यांनी शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे खडसे नेमक्या कोणत्या अडचणीच्या आणि प्रश्रांसंदर्भात शाहांना भेटणार आहेत किंवा भेट घेऊ इच्छितात, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. इतकेच नव्हे तर खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असेही बोलले जाते. कारण अनेक वर्ष मूळ भाजपमध्ये असलेले खडसे पक्षात राजकीय कोंडी झाल्याने नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, असे म्हटले जाते. तर दुसरीकडे काही कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये खडसे यांचे नाव घेण्यात आले होते. त्यामुळे या परिस्थिती संदर्भात ते शाह यांची भेट घेऊ इच्छितात असेही म्हटले जात आहे, मात्र अद्याप याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
BJP Girish Mahajan on Eknath Khadse Amit Shah Meet
Politics