कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईडीने अटक केलेले महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांची खाती काढून घेणे आणि पालकमंत्रीपद काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तथापि, ते पुरेसे नाही. नवाब मलिक यांना मंत्रिपद सोडावेच लागेल, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने सत्यजित कदम आणि महेश जाधव अशा दोन नावांची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला शिफारस केली असून पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय लवकरच पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल, अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत उपोषण केले, त्यावेळी आघाडी सरकारने त्यांना आश्वासने दिली. आघाडी सरकार फसवणूक करेल असा इशारा आपण त्यावेळी दिला होता व आता तसे घडताना दिसत आहे. आघाडी सरकारने मराठा आरक्षण, शिक्षणात सवलत, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना अशा सर्व बाबीत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्याबद्दल समाजात संताप आहे. मराठा समाजाच्या फसवणुकीबद्दल आपण सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असून सरकारला प्रश्नांची उत्तरे मागत या विषयावर चर्चा घडविणार आहे.
ते म्हणाले की, या सरकारने केवळ मराठा समाजाचीच नव्हे तर ओबीसी, अनुसूचित जाती, धनगर अशा इतर समाजघटकांचीही फसवणूक केली आहे. एसटीच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी या सरकारला पाझर फुटत नाही आणि सरकार एसटीचा संप मिटवत नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय भाजपाच्या दबावामुळे सरकारला स्थगित करावा लागला. तथापि, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एकूणच या सरकारबद्दल समाजाच्या सर्व घटकांमध्ये नाराजी आहे. या मुद्द्यांवर आम्ही मतदारांमध्ये जागृती घडवू आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेचा आशिर्वाद मिळवू.