नाशिक – नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना पक्षांतराच्या लाटेला प्रारंभ होणार आहे. यासंदर्भात आता आजी-माजी आणि विविध नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सातपूर परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शशिकांत जाधव हे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत. आगामी निवडणूक ते शिवसेनेच्या तिकीटावर लढविण्याची चिन्हे आहेत.
शशिकांत जाधव हे सातपूर परिसरातील अशोक नगर परिसराचे नेतृत्व करतात. जाधव हे उद्योजक आहेत. नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या संघटेनेचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. जाधव यांनी त्यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून सुरू केली. मनसेच्या तिकीटावर त्यांनी चांदवड तालुक्यात निवडणूक लढविली. त्यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेची निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांना महापौरपदाचीही संधी चालून आली होती. मात्र, हातातोंडाशी आलेला घास त्यांचा हिरावला गेला. त्यावेळी त्यांना सभागृहनेते पदावर समाधान मानावे लागले. मनसेची लाट ओसरल्याने जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुन्हा ते नगरसेवक झाले. त्यामुळे सगल दहा वर्षे ते सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राहिले आहेत. आताही भाजपची महापालिकेत सत्ता आहे. मात्र, आगामी निवडणूक लक्षात घेता भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचे संकेत जाधव यांनी दिले आहेत. जाधव यांनी त्र्यंबकरोडवर फ्लॉवर पार्क साकारला आहे. या पार्कचे उदघाटन करण्यासाठी जाधव यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना निमंत्रण दिले आहे. हा उदघाटन सोहळा शनिवारी (२० नोव्हेंबर) रोजी संपन्न होणार आहे.