मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे भाजपवर वारंवार टीकास्त्र सोडत आहेत आता त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा कट भाजपने रचल्याचा अतिशय गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. याबाबत गृहमंत्रालयाला सादरीकरण करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला. याबाबत राऊत यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले की, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पक्षाचे नेते, बिल्डर, व्यापारी यांचा गट या कटाचा भाग आहे.
राऊत म्हणाले की, मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याबाबतचे सादरीकरण या गटाने गृहमंत्रालयाला दिले आहे. या कामासाठी बैठका घेऊन निधी गोळा केला जात आहे. हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. ते यात पूर्णत: गुंतले आहे. मी हे रोखठोक सांगत आहे. कारण माझ्याकडे माझे म्हणणे सिद्ध करण्यासाठी पुरावे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याची जाणीव आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमालीची घसरली आहे, असे सांगण्यासाठी सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील गट येत्या काही महिन्यांत न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याचा दावा शिवसेनेच्या खासदाराने केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली हे शहर केंद्रशासित प्रदेश करण्यात यावे. राऊत म्हणाले की, सोमय्या यांनी यापूर्वी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते.