पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाजपची अधिकृत प्रतिक्रीया देण्यात आली आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली पण खोदा पहाड निकला चूहा असे झाले. असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही. या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरणनिर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.