मुंबई – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातही वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन झाले.या आंदोलनात पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. नाशिक शहरात भाजपतर्फे मुंबई – आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
राज्यात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे येथे कात्रज बायपासजवळ ठिय्या आंदोलन केले, तर मुंबईत मुलुंड चेक नाक्यावर आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारने ठोस पाऊल न उचलल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळ आली. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्यानंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असे सांगितले.
तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेलं. राज्य सरकार आपल्या अपयशाचं खापर मोदींवर फोडते आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.









