इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी मंत्री व शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, त्यांचे पुत्र ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. डांगे यांच्या पक्षप्रवेशावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, पृथ्वीराज देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ‘जनसुराज्य’ चे समित कदम, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी उपस्थित होते.
जनसंघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वाढीत मोलाचा वाटा असणा-या शीर्षस्थ नेत्यांमधील एक नेता या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णा डांगे यांच्या कार्याचे कौतुक केले. श्री. डांगे यांची घरवापसी ही आनंदाची बाब असून आम्ही तुम्हाला सांभाळून घेण्याएवजी ज्येष्ठ या नात्याने तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या अशी भावनिक साद श्री. फडणवीस यांनी घातली. आम्ही चुकलो तर रागवा, तुमच्या आशीर्वादाने भाजपा आणि पक्ष कार्यकर्ते उत्तम काम करू अशी ग्वाही ही श्री. फडणवीस यांनी दिली. श्री. डांगे यांनी पक्ष सोडला तरी पक्षाच्या मूलभूत विचारांवर टीका केली नाही. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या शब्दाला भाजपामध्ये सदैव मान देण्यात आला होता तोच मानसन्मान पुन्हा मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. दुर्दैवाने काही गैरसमजापोटी अण्णा भाजपा सोडून गेल्यानंतर प्रत्येक नेत्याला हळहळ वाटली होती ही कबुलीही त्यांनी दिली. आज मात्र विनंतीला मान देऊन ते आज आपल्या घरात परत आले आहेत याचा मनस्वी आनंद झाला आहे असेही त्यांनी नमूद केले. चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या वास्तूला गतवैभव मिळवून देण्यासाठी श्री. डांगे यांनी केलेल्या कामाचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि विकास नीतीवर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तो विश्वास सार्थ ठरेल. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे डांगे कुटुंब आज भाजपामध्ये आल्याने त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यास गती मिळेल. भाजपामध्ये त्यांचा यथोचित आदर राखण्यात येईल आणि त्यांच्या साथीने परिसराचा विकास करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.
श्री. अण्णा डांगे म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. 20 मार्च 2002 ला भाजपाचा राजीनामा दिला आता 23 वर्षांनी भाजपामध्ये येण्याचे समाधान आहे. मागची अनेक वर्षे अनेक पक्षात काम केले पण योग्य ती दखल घेतली नाही .आता भाजपाच्या वाढीसाठी विकासासाठी झटून काम करू असेही ते म्हणाले.
सांगलीमध्ये शरद पवार गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक सुभाष देसाई,माजी जि.प. सदस्य भानुदास वीरकर, दिनदयाळ मागासवर्गीय सह. सूत गिरणीचे चेअरमन अमोल चौधरी, माजी नगरसेवक श्रीकांत माने, अशोक देसाई, मोहम्मद गणीभाई, जालिंदर कोळी, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष गोपाल नागे,युवक कॉंग्रेस पार्टी उपाध्यक्ष अभिजीत रासकर आदींचा समावेश आहे