इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक येथे आज शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुनील बागुल व मामा राजवाडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे मंत्री महाजन यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेश सोहळ्यात बाळासाहेब पाठक यांच्यासह बागुल यांच्या अनेक समर्थकांनीही प्रवेश केला.
असा पडला होता प्रवेश सोहळा लांबणीवर
सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा अगोदर प्रवेश सोहळा होणार होता. पण, भाजपच्या या प्रवेश सोहळा होण्याअगोदर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी नाशिक मध्ये शिवसेना पदाधीका-यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) भाजपात प्रवेश करत आहेत! या टीकेनंतर मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा लांबणीवर पडला होता.