नवी दिल्ली – जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी घेऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र या मुद्द्यावर भाजपच्या गोटात संभ्रम असल्याचे दिसत आहे. भाजप नेते या मुद्द्याला विरोधही करत नाहीत आणि खुल्या मनाने पाठिंबाही देताना दिसत नाही.
प्रतिनिधी मंडळातील सदस्य भाजप नेते आणि मंत्री जनकराम म्हणाले, पंतप्रधान मोदी जो काही निर्णय घेतील तो स्वीकारला जाईल. जातीवादी राजकारण करणा-या पक्षांवर त्यांनी टीकाही केली. अनेक नेते जाती आणि समाजाच्या नावावर आपले राजकीय करिअर पुढे नेतात. नंतर ते आपल्या कुटुंबातील लोकांना पुढे आणण्यातच मश्गुल होतात, असा निशाणा त्यांनी साधला.
जनकराम यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांची तुलना एका कुटुंबातील पालकाप्रमाणे केली. अनुसूचित जाती-जमातींतील लोकांची नियमित गणना केली जाते. पंतप्रधान स्वतः इतर मागासवर्गीयांमध्ये येतात. प्रथमच देशाला असा पंतप्रधान लाभला ज्यांनी जातींऐवजी विकासाला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, जातीनिहाय जनगणना करावी किंवा नाही याबाबत कोणत्याही भाजप नेत्याने थेट उत्तर दिले नाही. देशाचा सर्वांगीण विकास कसा साधायचा हे पंतप्रधान मोदी जाणतात आणि ते त्या पद्धतीने काम करत आहेत, असे भाजप नेते सांगतात. बिहार विधानसभेत जातीनिहाय जनगणना करण्याबाबत संमत करण्यात आलेल्या दोन ठरावांना भाजपने पाठिंबा दिला होता. परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते अद्याप याबाबत स्पष्ट बोलायला तयार नाहीत. लोकसभेतील भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी जातीनिहाय जनगणनेचे समर्थन केले होते.
भाजपची रणनीती काय
राजकीय तज्ज्ञांच्या मते, आगामी उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते या मुद्द्यावर काहीच बोलणार नाहीत. विरोधी पक्षांच्या म्हणण्यावरून जातीनिहाय जनगणना केली तरी भाजपने फ्रंटफुटवर कुठेच दिसू नये, अशी भाजपची रणनीती आहे. त्याशिवाय अशी मागणी भाजपमधील फक्त दलित किंवा ओबीसी नेत्यांनी केली आहे. त्याच समाजांचा दबाव असल्याचे सांगत पक्ष आपला चेहरा वाचवू शकतो. त्यामुळेच या मुद्द्यावर भाजप नेते “ताक फुंकून पित” आहेत.
जनगणना कधी
जातीनिहाय जनगणनेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २०२१ मध्ये होणार्या जनगणनेच्या तारखांबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. कोविडच्या परिस्थितीनुसार जनगणना केली जाईल, असे अधिका-यांचे म्हणणे आहे. फिल्डवरील कामे वगळून इतर कामे सुरू आहेत. सरकारनेच कोविडमुळेच जनगणना अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली होती.