मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेविका आकांक्षा शेट्टी यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपा मुंबई अध्यक्ष व राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, उबाठा सेनेची अवस्था ही धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. मुंबईकर, हिंदू सण, हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे विचारांच्या विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा गटाची अवस्था धोकादायक झाली आहे. या जीर्ण झालेल्या पक्षात कोणाचीच राहण्याची तयारी नाही. विधान परिषदेतील भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते .
शेलार म्हणाले की गरीब कल्याण आणि विकासाची कास धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने तायडे आणि श्रीमती शेट्टी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशाचा हा पहिला अंक आहे, पुढचा दुसरा अंक हा दमदार असेल आणि तिसरा अंक तर समारोपाचा असेल असा इशारा शेलार यांनी उबाठाला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आणि सरकार मुंबईकर, मुंबईच्या विकासासाठी झटत आहे. त्यामुळे मराठी माणूस, देशहित याच्याशी प्रतारणा करण्याचा मुद्दाच नाही असे शेलार यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि केंद्रातील मोदी सरकारच्या सहकार्याने मुंबईत जवळपास सात लाख कोटींची विकास कामे सुरू आहेत. मविआचे सरकार असताना तुम्ही काय केले ते सांगा किंवा थेट चर्चेला या असे आव्हान शेलार यांनी दिले. तांत्रिक दृष्ट्या मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या नगरसेवकांच्या आकड्याला पार करत भाजपा नंबर एकचा पक्ष बनल्याचेही शेलार स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले की तायडे आणि श्रीमती शेट्टी भाजपाची विचारधारा जनमानसांपर्यंत रुजवतील. आंबेडकरी जनतेचे उदयोन्मुख नेतृत्व असलेले तायडे आता यापुढे भाजपाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करतील.
सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न
पक्षातील कार्यकर्ते, समर्थक, नेते, मतदार टिकत नाहीत म्हंटल्यावर सहानुभूती मिळवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपा आम्हाला संपवू पहातेय अशी भाषा उद्धव ठाकरे वापरत आहेत. पक्षाची जीर्णावस्था रोखण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आम्ही कोणाला संपवायला राजकारणात आलेलो नाही. मुंबईचा विकास, सेवा यासाठी भाजपा काम करत असून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन हेच आमचे ध्येय आहे, असे शेलार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.