मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीसह महायुतीला या राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर ज्या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे. ही निवडणूक व त्यातून जनतेने दिलेला कौल इतर अनेक निवडणुकीपेक्षा वेगळा आणि महत्वाचा आहे. जनादेश स्पष्ट आहे की, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रभूमीत खोटारडेपणाला, संधिसाधू वृत्तीला, भ्रष्टाचाराला व जातीयवादी राजकारणाला अजिबात थारा नाही असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, महायुती सरकारच्या आजच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे प्रमुख नेते, संत – महंत, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्या माय – बाप जनतेने आजचा दिवस महायुतीच्या आयुष्यात आणला ती माय – बाप जनता महायुती सरकारला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणार आहे.
महायुती सरकारला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व जनतेचे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो असेही बावनकुळे यांनी सांगितले.