मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याअगोदर कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. आता उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले.
या निवडीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुका लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत प्राप्त झाले. उद्याचा शपथविधीचा दिवस म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे व राज्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा हा क्षण अतिशय आनंददायी व हर्षोल्हास साजरा करण्याचा क्षण आहे.
चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ गटनेतेपदासाठी मांडला. या प्रस्तावाला सर्वांनी समर्थन देत गटनेतेपदी निवड केली. या बैठकी अगोदर मुंबईतभाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक झाली. त्यात गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले.
या दोन्ही बैठकीत निरीक्षक म्हणून आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते. या दोन्ही बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बाबनकुळे, पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, अशोक चव्हाण, गिरीष महाजन, मनिषा चौधरी, प्रविण दरेकर, पराग अळवणी यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. तर विधिमंडळ निवडीच्या बैठकीत सर्व भाजप आमदार उपस्थित होते.