इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून आज मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत शर्य़तीतून माघार घेतल्याचे संकेत दिले. त्यानंतर आता फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमित शाह यांच्या उपस्थितीत फडणवीस, शिंदे व अजितदादा यांची बैठक होणार आहे. त्यात सहमतीने फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आज नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॅार्म्युलावर चर्चा होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक २१ मंत्रिपदे मिळू शकेल. तर शिवसेना शिंदे गटाला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे. पण, शपथविधीच्या सोहळयात महायुतीचे २० आमदार पहिले मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यात सर्वाधिक भाजपचे असणार आहे.