मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे नालासोपारा ,वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं, मतदानाचा टक्का कसा वाढेल ,बोगस मतदान कसे थांबावं ,या बैठक घेत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार आणि नालासोपारा भागात वाटणार आहेत असा आरोप करण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं. आणि विनोद तावडे यांना षडयंत्र पुर्वक गोवण्यात आले. विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि त्या पदावर असलेले व्यक्ती अशा प्रकारे पैसे वाटप करतील का ? याचा विचार केला पाहिजे.
खरे तर विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे.. निवडणूक हातातून गेलेली आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आणि विनोद तावडे यांना बदनाम करण्याचा प्रकरण आहे. तपास यंत्रणेने याबद्दल दखल घेतली आहे. तपास यंत्रणा याचा तपास करेल पण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू. तावडे निष्कलंक आहेत त्यांच्यावरती जे आरोप झाले ते आरोप चुकीचा असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या…विनोद तावडे
वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी.