इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास एक लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा विशेष संवाद ‘नमो ॲप’च्या माध्यमातून व ऑनलाइन पद्धतीने साधला जाईल. शनिवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता हा संवाद साधला जाणार आहे.
भाजपने आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केली आहे. या संवादाद्वारे मोदी भाजपच्या निवडणूक रणनितीला बळकटी देतील आणि बूथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश देतील. हा संवाद कार्यक्रम भाजपच्या निवडणूक तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बूथ प्रमुख हा निवडणुकीच्या व्यवस्थापनात कणा मानला जातो आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतील. मोदी यांचा थेट संवाद कार्यकर्त्यांना नवा जोम आणि आत्मविश्वास प्रदान करेल.
‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ हा उपक्रम कार्यकर्त्यांना एकजूट करणे आणि बूथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.