इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे आणि सर्व राजकीय पक्ष या समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र या वेळी भाजपने संपूर्ण निवडणूक प्रचारात मराठाऐवजी ओबीसी समाजाला महत्त्व दिले आहे.
महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या ३८ टक्के आणि मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या जागांवर राजकीय फटका बसल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. महायुती सरकार विशेषतः एकनाथ शिंदे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या बाजूने आहे, असे वाटल्याने लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदार भाजपवर नाराज होते. लोकसभा निवडणुकीत हा समाजही भाजपपासून दूर गेला; परंतु लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने जरांगे यांना अजिबात किंमत दिली नाही. आता जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी १७५ जागांवर ओबीसी मतदार आहेत, तर मराठा समाजाचा प्रभाव बहुतांशी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे. ११६ जागांवर मराठा समाजाचा प्रभाव आहे. महाराष्ट्रात ओबीसी मते मिळविण्यासाठी विदर्भात मोठी लढत सुरू आहे. कारण येथील ६२ पैकी ३६ जागांवर ओबीसी जातीच्या मतदारांचा चांगला प्रभाव आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केले, की महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात एकत्र आले आहेत. ओबीसी चेहऱ्याचा हरियाणात भाजपला फायदा झाला. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, की आपल्या रणनीतीचा एक भाग म्हणून पक्ष ओबीसींमधील अज्ञात आणि लहान जाती गटांपर्यंत पोहोचत आहे आणि त्याचा फायदा नुकत्याच झालेल्या हरियाणा निवडणुकीत झाला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत ओबीसी चेहरा नायबसिंग सैनी यांना आघाडीवर ठेवण्याचा भाजपला फायदा झाला. हरियाणातील काँग्रेसच्या जाट चेहऱ्याच्या भूपेंद्रसिंग हुडा यांच्या विरोधात ओबीसी जाती एकत्र आल्या आणि भाजपने अत्यंत अवघड समजली जाणारी निवडणूक जिंकली. महाराष्ट्रातही भाजपला हरियाणाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे.