इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत भाजप आणि महायुती कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. भाजप आणि महायुतीच्या बाजूने हिंदू मतांची जमवाजमव करण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपला मदतीचा हात दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ६५ हून अधिक मित्र संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ‘सजग रहो’ (‘सावधान रहा, सतर्क रहा’) मोहीम सुरू केली आहे. त्याचा उद्देश केवळ विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करणे आणि हिंदूंना एकत्र करणे हा नाही. ही मोहीम कोणाच्या विरोधात नाही. संघाच्या सूत्रांनी सांगितले, की ‘सजग रहो’ आणि ‘एक है हो सुरक्षित है’चा उद्देश कोणाच्या विरोधात नसून हिंदूंमधील जातीय फूट संपवणे हा आहे. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की हा संदेश देण्यासाठी स्वयंसेवक आणि ६५ हून अधिक स्वयंसेवी संस्थांकडून शेकडो सभा आयोजित केल्या जात आहेत. या सभांमुळे ज्या ठिकाणी भाजपला जातीच्या आधारावर विभाजनामुळे नुकसान सोसावे लागले, तेथील हिंदू एकत्र येतील, असा विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रांतात बैठका होणार आहेत.
चाणक्य प्रतिष्ठान, मातंग साहित्य परिषद आणि रणरागिणी सेवाभावी संस्था यांचा या मोहिमेत समावेश आहे. महाराष्ट्रभरातील संघाच्या चारही प्रांतातील कार्यकर्त्यांचाही या मोहिमेत सहभाग आहे. येथे शाखा स्तरावर बैठका आयोजित केल्या जात आहेत. या मुद्यांवर चर्चा होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -भाजप समर्थक आणि इतर मतदारांसोबत या बैठका होत आहेत. यामध्ये हिंदूंवर व्होट बँकेच्या राजकारणाचा परिणाम, बांगला देशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचा निवडणुकांवर होणारा परिणाम आणि समाजातील सूडाचे राजकारण या मुद्द्यांवर चर्चा घडविली जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की जातीच्या आधारावर विभाजन होऊ नये, हे हिंदू समाजाला सांगण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी उचलली आहे. राज्यात मराठा-ओबीसी विभाजन अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल असून भाजपला अडचणीच्या काळात तारणारे ठरण्याची शक्यता आहे.