इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. जनतेची एकच भावना आहे, की आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याचे सूतोवाच केले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आज शाह यांची सभा पार पडली. या सभेत शाह यांनी महाविकास आघाडीवर आणि विशेष करून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शाह यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिराळा येथे समर्थ रामदास स्वामींना अभिवादन केले. तसेच २० नोव्हेंबर रोजी डबल इंजिनचे सरकार आणण्यासाठी महायुतीला मतदान करण्याची भूमिका घ्या, असे सांगितले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हायला हवे की नको? पण महाविकास आघाडीचे नेते याला विरोध करत आहेत. जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा; पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार, असे आव्हान त्यांनी दिले.
शाह म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही कलम ३७० हटविले. संपूर्ण देशाने याला पाठिंबा दिला; मात्र ठाकरे आणि पवार याला विरोध करत आहेत. मी आज पवार यांना आव्हान देतो, की तुमच्या चार पिढ्या आल्या तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत. शिराळामध्ये नागपंचमीनिमित्त खऱ्या नागांची पूजा केली जात असे; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या परंपरेवर बंदी घालण्यात आली आहे. परंपरागत नाग पूजा करण्यास आमचा विरोध नाही. नाग पूजा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याला कुणीही रोखू शकत नाही.
शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणानंतर सांगितले, की मी नंतर दर्शनाला जाईल; पण ते अद्याप दर्शनाला गेले नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही गेले नाहीत. ते का गेले नाहीत? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेने विचारावा. त्यांना आपली मतपेढी सांभाळायची आहे, म्हणून ते राम मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत. पण आम्ही त्यांच्या मतपेढीला घाबरत नाही, अशी टीका शाह यांनी केली.
			








