मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माहीम विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर भाजप मनसेचे अमित ठाकरे यांचा प्रचार करणार असल्याचे भाजप नेते प्रसाद लाड यांनी सांगितले. ते म्हणाले तुझा प्रचार मी करणार असल्याचे मी अमितला सांगितले आहे. फडणवीस, शेलार यांनी देखील यासंदर्भात सांगितले आहे. त्यामुळे यात लपवण्यासारखे काही नाही. या जिल्ह्याीतल मी निरीक्षक आहे. अमित ठाकरे यांचा प्रचार आम्ही खुलेपणाने करणार आहे.
त्यांच्या या विधानानंतर महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. लाड यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये जे उमेदवार ठरले त्यांचा प्रचार सर्वांनाच करावा लागणार आहे. असे एकाचा प्रचार करता येणार नाही असे करुन तेढ निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले. या मतदार संघात शिंदे गटाने अमित ठाकरे यांना पाठींबा द्यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहे. पण, सदा सरवणकर यांनी या दबावाला झुकारत उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
माहीम चर्चेतला मतदार संघ
माहीम मतदार संघात सध्या चर्चेचा मतदार संघ ठरला आहे. या मतदार संघातून मनसेचे अमित ठाकरे ह पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे महायुतीने त्यांना पाठींबा देण्याच्या हालचाली सुरु केल्या. पण, सरवणकर यांनी निवडणूक लढवणारच असे सांगत प्रचारही सुरु केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.