नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी विरोधात भाजपने इंजिनिअर असलेल्या नाव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या मतदार संघात पोटनिवडणूक होत असून येथील लढत आता रंगतदार होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी येथे मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
नाव्या हरिदास या ३९ वर्षाच्या असून त्या मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्यांचे पती शोभीन श्याम आहे. नाव्या यांनी केएमटीसी इंजिनियरिंग कॅालेजमधून २००७ मध्ये बी.टेक केले. त्या भाजप महिला मोर्चाचे राज्य महासचिव आहेत. २०२१ मध्ये त्यांनी कोझीकोड दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण, त्यांचा त्यात पराभव झाला. त्या तिस-या क्रमांकावर होत्या.
या कारणामुळे पोटनिवडणूक
राहुल गांधी यांनी रायबरेली व वायनाड मधून निवडणूक लढवली. या दोन्ही मतदार संघात ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. प्रियंका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक असून त्यांना येथील मतदार कसे साथ देतात हे महत्त्वाचे आहे.