मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री, भाजपचे जेष्ठ नेते आणि प्रदीर्घकाळ औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व आणि फुलंब्री मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे हरिभाऊ बागडे उर्फ नाना आता आगामी काळात आमदारकीची निवडणूक लढविणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
खुद्द हरिभाऊ बागडे यांनीच दिवाळी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात या संदर्भात घोषणा केल्याने पक्षातील इच्छुक असलेल्या नव्या उमेदवारांच्या आशा – आकांक्षा पल्लवी झाल्या आहेत, परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला तिकीट मिळते हे अद्याप समजणे कठीण आहे. आगामी काळातच यासंदर्भात माहिती मिळू शकते, असे दिसून येते.
फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दीपावली मिलन कार्यक्रमात बोलतांना बागडे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. मात्र हे माझे मत असून, पक्षाचे मत नाही. त्यामुळे पक्षाकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे मी पुढील काम करेल असे बागडे म्हणाले. तसेच माझे सालदारकीचे केवळ दीड वर्ष बाकी असून पुन्हा सालदार होण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे अनेकांच्या आशा व आकांक्षा निश्चितच वाढल्या आहेत. अशा सर्वांचे परमेश्वर भलं करो, या सर्वांनाच माझ्या शुभेच्छा आहे, असेही ते म्हणाले
हरिभाऊ बागडे यांनी आता आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून बागडे यांनी आतापर्यंत सहा वेळ विजय मिळवला आहे. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदावर देखील काम केले असून आता त्यांचे वय ७७ वर्षांचे आहे. नानांनी स्वतःच विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शाळेत असताना पेपर विक्री, आमदार, मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा बागडेंचा आजवरचा प्रवास राहिला आहे. बागडेंच्या रूपाने सर्व सामांन्यांशी नाते सांगणारा विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला होता. बागडेंची राहणी आजही अत्यंत साधी असून पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोषाख आहे.