नाशिक – नाशिकमध्ये दरोडे व खून सत्र हे सतत वाढत असून मागील पंधरवड्यापासून एकूण नऊ खून होणे हे नाशिकची प्रतिमा मलिन होण्याचे लक्षण आहे. मागील काही वर्ष अतिशय शांत असलेले शहर अचानक हल्लेखोर होऊन या गुंड व मवाल्यांना कोण बळ देत आहे. हे शोधण्याची गरज आहे. प्रशासनाची निष्क्रियता, शासनाचे दुर्लक्ष आणि जनतेची ससेहोलपट यामुळे नाशिकची प्रतिमा अशांत शहर असं करण्याचं काम हे नतदृष्ट करत असल्याची प्रतिक्रिया भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, नाशिकच्या विकासाची गप्पा मारणारे सत्ताधारी आता भर दिवसा उद्योजकांचे मुडदे पाडले तरी वसुलीत गुंग असल्याने आता जनतेनेच उठाव करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझ्या मते आता कामावरून कमी केल्याचा राग येऊन उद्योजकांचे खून पाडण्याची मानसीकता होत असेल तर सर्व उद्योजकांनी शस्त्र परवाने घ्यायचे की काय ? याचे उत्तर पालकमंत्र्यांनी देण्याची गरज असल्याचा संतप्त सवालही त्यांनी केला. फक्त आरोपी पकडले म्हणजे पोलिसांचे काम झाले असं समजून चालणार नाही तर हे करण्याची हिंमत होता कामा नये हे खरे पोलीसींग होय हे आमच्या पोलीस आयुक्तांना कळाले तर बरे होईल असेही पेशकार म्हणाले.