मुंबई – उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी असलेल्या फडणवीस यांचे गोव्यातील यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, आ. आशीष शेलार आदी या प्रसंगी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाच्या विकासाला वेग देण्यासाठी आणि गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ हा जनतेला वाटणारा विश्वास निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झाला आहे. गोवा निवडणूक लढविण्यास गेलेल्या महाराष्ट्रातील काही पक्षांचा पुरता धुव्वा उडाला. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची लढाई ‘नोटा’ शी आहे हे माझे भाकीत गोव्यातील मतदारांनी खरे ठरवले. गोव्यातील विजयात महाराष्ट्रातून गेलेल्या खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचीही वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. या विजयानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवून मुंबईकरांची भ्रष्टाचारापासून मुक्तता करण्यासाठी आणि राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी गोवा विधानसभा निवडणुकीचे योग्य नियोजन करून पक्षाला विजय मिळवून दिला. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांच्या संघटन कौशल्याचा प्रत्यय आला आहे.