विशेष प्रतिनिधी, कोलकाता :
पश्चिम बंगाल मध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत कदाचित भाजपचीच सत्ता येईल, या अपेक्षेने तृणमूल काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्याने आता भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी पुन्हा सुगृही परतण्याची वाट धरली आहे. भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांच्यापासून या पक्षांतराला सुरुवात झाली असून भाजपला आणखी झटके मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री मंडळातून नुकतेच काढून टाकलेले लोकसभा खासदार बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यातील बहुतांश नेते हे पुर्वी तृणमूल काँग्रेस मध्येच होते, परंतु सत्तेत बदल होण्याची शक्यता पाहून काही काळापूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे भाजपला आता भीती आहे की, पश्चिम बंगालच्या सद्य परिस्थितीत त्याचे आणखी काही नेते पक्ष सोडू शकतात.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता तृणमूल काँग्रेसकडून भाजप नेत्यांवर सातत्याने दबाव वाढत आहे. राज्यातील सर्व नेते सतत आपल्या तक्रारी घेऊन दिल्लीत येत आहेत. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भातील अनेक कागदपत्रे दिली. राज्यातील अनेक भाजप आमदार पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेऊन तृणमूल काँग्रेसकडून दबाव आणल्याबद्दल तक्रार करत आहेत. अशा स्थितीत अनेक आमदार अजूनही भाजप बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये जाणे हेच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे एकमेव कारण आहे. संतापलेल्या सुप्रियोने ३१ जुलै रोजी भाजप सोडण्याची घोषणा केली होती. तसेच इतर कोणत्याही पक्षात सामील होणार नसल्याचे सांगितले होते. लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याबाबतही ते बोलले होते. आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ ३ आमदारांवरून ७७ पर्यंत वाढले, परंतु तरीही ते सत्तेपासून दूर राहिले. तर दुसरीकडे, ममता बॅनर्जींनी प्रचंड विजय मिळवून आपली सत्ता टिकवली. दरम्यान,भाजपचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, राज्यातील ममता बॅनर्जी सरकारकडून भाजपच्या आमदारांवर सतत दबाव आणला जात आहे. पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका वाढत आहे. अशा स्थितीत काही नेत्यांनी पक्ष सोडला तर त्यांची मजबुरी समजू शकते.