गांधीनगर – गुजरातमध्ये निवडणुकीच्या एका वर्षापूर्वीच भारतीय जनता पार्टीने नेतृत्वबदल केला आहे. शिवाय संपूर्ण टीमही नवी निवडली आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मंत्रिमडळातील २४ मंत्र्यांना गुरुवारी शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळात एकही जुन्या चेह-याला संधी देण्यात आलेली नाही. हे पाऊल म्हणजे लोकशाहीवादी प्रयोग असल्याचे भाजपने म्हटले आहे. गुजरातमध्ये राबविलेले राजकीय प्रयोग इतर राज्यात लागू करण्याचा प्रयत्न याआधीही भाजपने केला आहे. त्याचा राजकीय लाभही त्यांना मिळाला आहे. नो रिपिट फॉर्मुल्याच्या यशाची पडताळणी आगामी वर्षातील निवडणुकीनंतरच होणार आहे.
नवे नेतृत्व तयार करण्याच्या या प्रयोगातून देशात प्रेरणा मिळेल, असे भाजपने म्हटले आहे. गुजरातमधील नव्या मंत्रिमडळाच्या शपथग्रहण कार्यक्रमानंतर केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांनी हा नवा प्रयोग असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे जुने नेतृत्व आणि माजी मंत्री नाराज झाल्याच्या वृत्ताला त्यांनी फेटाळले आहे. हा निर्णय सर्वसमंतीने घेतला होता. ते सर्व शपथग्रहण कार्यक्रमात उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. जो पक्ष स्थिरता आणि सातत्याने काम करतो तो नवे नेतृत्व उभारतो, असे यादव यांनी म्हटले आहे. जुन्या नेत्यांच्या अनुभवासोबत नवे नेतृत्व सरकार आणि संघटनेत सांमजस्याने काम करणार आहे. वरिष्ठ नेत्यांचा अनुभव पक्ष संघटना वाढविताना कामाला येईल. एका कुटुंबातही नवे नेतृत्व पुढे येऊ शकते. या लोकशाहीवादी प्रयोगाची देशभरात प्रेरणा घेता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.