नवी दिल्ली – भाजप नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढील वर्षी निवडणूक होऊ घातलेली असताना त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात राजीनामा देणारे ते भाजपचे तिसरे नेते आहेत. भाजपचा झारखंडमध्ये झालेला पराभव पाहता कोणत्याही राज्यात जोखीम पत्करायला वरिष्ठ नेतृत्व तयार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे काम न करणा-या मुख्यमंत्र्यांची गच्छंती केली जात आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीत दमदार पुनरागमन केले खरे. परंतु सहा महिन्यांनंतर झारखंडमध्ये पक्षाला परावभवाचा सामना करावा लागला. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून भाजप पराभूत झाला. अशा प्रकारचे निकाल हाती येतील, हा अंदाज पक्षाच्या अनेक नेत्यांनी लावला होता. तत्कालीन मुख्यमंत्री रघुबर दास यांची लोकप्रियता हे कारण अनेकांनी व्यक्त केले होते. झारखंडमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपने यावर्षी पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामध्ये विजय रुपाणी हे एक आहेत. नुकसान होण्याआधीच ते रोखले जावे, असे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे.
हरियाणामध्ये २०१९ मध्ये निवडणूक झाली होती. तेव्हासुद्धा बहुमत मिळविण्यास भाजपला अपयश आले होते. भाजपला युती करून सरकार स्थापन करावे लागले. मुख्यमंत्रिपदी मनोहरलाल खट्टर यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती. झारखंडमध्ये झालेला पराभव, हरियाणामध्ये चांगली कामगिरी करू न शकल्याने आता जे मुख्यमंत्री कमी लोकप्रिय आहेत आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली नाही, त्यांना पुढील निवडणुकीआधी पद सोडावे लागेल, असा निर्णय भाजपला घ्यावा लागला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपने याची सुरुवात याच वर्षी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यापासून केली. त्यानंतर तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. आता पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. आसाम निवडणुकीनंतर सर्बानंद सोनोवाल यांच्याऐवजी प्रचलित चेहरा असलेले हिमंत बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्रिपदी बसविले. वाढत्या वयाचे कारण देऊन कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांच्या हाती सूत्रे दिली. २०२३ ची विधानसभा निवडणूक येडियुरप्पा यांच्याविनाच लढण्याची तयारी केल्याचा संदेश पक्षाने दिला आहे.