विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या संसर्गामुळे भारतीय जनता पक्ष यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याचा विचार करत आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक सेवेला दोन दशके पूर्ण होत असल्याने भाजप १७ सप्टेंबर रोजी मोदी यांच्या वाढदिवशी २० दिवसांची ‘सेवा आणि समर्पण’ मोहीम सुरू करणार असून यात विविध कल्याणकारी उपक्रमांचा समावेश असेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून, भाजप त्यांचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून देशभरात साजरा करतो. यात एका आठवड्यासाठी कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करून साजरा केले जाते. यंदा मात्र हा उपक्रम वाढवून २० दिवस करण्यात आला आहे. कारण मोदी हे दोन दशकाचा राजकीय कालखंड पूर्ण करत आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या मोहिमेचा भाग म्हणून कार्यकर्त्यांना आरोग्य आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि गरिबांना रेशन वाटप करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यांनी भाजपच्या सर्व राज्यांतील कार्यकर्त्यांना कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन करून कल्याणकारी कामे करण्याचे सांगितले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना लसीकरण मोहीम सुलभ करण्यासाठी कोविड -१९ लसीकरण शिबिरांना भेट देण्यास सांगितले आहे. दरम्यान, या मोहिमेचा एक भाग म्हणून, भाजप कार्यकर्ते २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवतील आणि लोकांना खादी आणि स्थानिक उत्पादनांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाईल. त्याचप्रमाणे भाजपचा किसान मोर्चाही मोदींचा वाढदिवस देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘किसान जवान सन्मान दिवस’ म्हणून साजरा करणार असून या उपक्रमांतर्गत पक्ष कार्यकर्ते हे सैनिक आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा सन्मान करेल.