नाशिक : राज्यातील मंदिरे खुली करावी या मागणीसाठी गोदाघाटावर शंखनाद आंदोलन करणा-या भाजप आमदार व आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.सिमा हिरे,आध्यात्मिक प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले,महेश पंडित,शहराध्यक्ष गिरीश पालवे,रामसिंग बावरी,सतिष शुक्ल,शिवम शिंपी,उत्तमराव उगले,चंद्रशेखर पंचाक्षरी,धनंजय पुजारी,बिजय बनसोडे,शेखर शुक्ल,नवनाथ ढगे व त्यांचे १२ ते १३ महिला व पुरूष आंदोलनकर्ते साथीदार यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोळसे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कोविड -१९ प्रादुर्भाच्या पार्श्वभूमिवर शंखनाद आंदोलनास पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारलेली असतांना संशयीतांनी सोमवारी (दि.३०) आंदोलन छेडले. साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे माहिती असतांनाही संशयीतांनी रामकुंड येथे शंखनाद आंदोलन छेडून मनाई आदेशाचे उलंघन केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.