रावेर येथील शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांनी मंगळवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नंदू महाजन, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे देशाचा आणि राज्याचा विकास गतीने होत आहे. रावेर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या श्री. पाटील यांचा भाजपा परिवारात पुन्हा प्रवेश झाला आहे, ही आनंदाची बाब आहे. ज्या विश्वासाने श्री. पाटील आणि समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्या विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. श्री. पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपा संघटनेला बळ मिळेल असे गिरीश महाजन म्हणाले.
माजी आमदार अरुण पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्याचा वेगाने विकास होत आहे. या विकासाला आमच्यापरीने हातभार लावण्यासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाची ध्येयधोरणे अंगी असल्याने ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेने काम करेन. पक्ष मला सांभाळून घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या चौकटीत राहून विकासासाठी काम करेन असा शब्दही त्यांनी दिला.
रावेर येथील शरद पवार गटाचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, वि. का.सह. सेवा संदस्य चे चेअरमन सुरेश पाटील, निंभोरा गावचे माजी सरपंच सचिन महाले, शिंगाडी गावचे माजी सरपंच महेंद्र बागडे यांचाही भाजपा मध्ये प्रवेश झाला.