नाशिक – पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे पक्षी घरासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नाशिकमध्ये वाढले पाहिजे. असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज नाशिक येथील पुरीया पार्क सर्कल, दिंडोरी नाका पंचवटी या ठिकाणी उभारण्यात आलेले पहिले पक्षी पार्कचे उदघाटनावेळी ते बोलत होते.
पंचवटीतील परशुराम पुरिया पार्कमध्ये ६५ फुटी पक्षी घर साकार झाले आहे. या पक्षी घराचा बेस जमिनीपासून दहा फुट असून ते एकूण १२ फुट उंच आहे.या अनोख्या संकल्पनेतून पक्षांच्या दाणापाण्याची सोय होणार असून रेडीमेड घरट्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. या पक्षी घरात पक्षांसाठी एकूण ८०० रेडीमेड घरटी असून सुमारे चार हजार पक्षी यात राहू शकणार आहे. सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या मदतीने या पक्षी घराची देखभाल करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की गुजरात मध्ये पक्षीघर ही संकल्पना राबवित असल्याने म्हैसने या तालुक्यात ठीकठिकाणी अशी पक्षीघरे पहायला मिळत आहे. त्याचधर्तीवर नगरसेवक गुरमीत बग्गा यांच्या संकल्पनेतून नाशिक येथे हे पहिले पक्षी घर विकसित करण्यात आले आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात यावा. त्यातून पक्षांची संख्या वाढणार आहे. तसेच पर्यटन वाढीसाठी देखील हा अनोखा उपक्रम ठरणार आहे.
सिमेंटच्या जंगलात किमान पंचवटी परिसरात पक्ष्यांची किलबिलाट वाढणार आहे. नाशिक शहर व परिसरातील वातवरण अतिशय चांगले असल्याने नाशिक शहर व परिसरात असे प्रकल्प राबविण्यात यावेत. त्यातून पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नागरिकांना निसर्ग जवळुन समजुन घेता यावा व भावी पिढीला निसर्गाबाबत अधिक सजगता यावी, यासाठी देखील असे उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार ॲड. राहुल डिकले, आमदार सुधीर तांबे, नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, नाशिक मनपाचे आयुक्त कैलास जाधव, माजी आरोग्य राज्यमंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार देविदास पिंगळे,नगरसेवक गुरमित बग्गा, नगरसेविका नंदिनी बोडके, नगरसेविका विमलताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, कविताताई कर्डक, शाहू खैरे,नरेंद्रभाई ठक्कर, नरेश पाटील, शंकर मोकळ शहर अभियंता नितीन वंजारी हे उपस्थित होते.