मुंबई – ‘शंभर कोटी’ ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांचा चेहरा येत असला तरीही या आकड्याशी देशातील अनेक लोकांचा जवळचा संबंध आहे. शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांचा आकडा आपण बघितला तर भारत हा मध्यमवर्गियांचा नव्हे तर श्रीमंतांचा देश आहे, असेच आपल्याला मान्य करावे लागेल.
शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये जवळपास दुप्पट झालेली आहे. 2018-19 मध्ये 77 लोकांकडे एवढी संपत्ती होती. त्यानंतर 2019-20 मध्ये 141 आणि आता 2020-21 मध्ये ही संख्या 136 आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी राज्यसभेत गेल्या तीन वर्षांत आयकर विभागात फाईल करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या संपत्तीच्या अहवालाची माहिती दिली. शंभर कोटी म्हणजे तब्बल 1 अरब रुपयांची संपत्ती ऐकायलाच एवढी मोठी असेल तर त्याचे रुप किती भव्य असेल, याचा अंदाज लावलेलाच बरा.
लॉकडाऊनमध्ये वाढली संख्या
अरबपतींची संख्या लॉकडाऊनमध्ये वाढल्याचेही अर्थमंत्र्यांनी मान्य केले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाकडे यासंदर्भात असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी हे सांगितले. विशेष म्हणजे ज्या कालावधीत देशातील बहुतांश लोकांवर गरिबी ओढवली, त्याच काळात अरबोपतींची संख्या वाढत होती, ही आश्चर्याची बाब आहे.
27 कोटी लोक आहेत गरीब
भारतात गरिबी रेषेखालील लोकांची संख्या 27 कोटी म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 21.9 टक्के आहे, असे विद्यमान तेंडुलकर समितीच्या कार्यप्रणालीवरून स्पष्ट होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास या योजनेवर भर देऊन लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले.