वॉशिंग्टन – प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दोघांनी संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही जोडीदार म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी खासगीपण द्यावे “, असे बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
गेले २७ वर्षे सोबत प्रवास केला. आम्ही आमच्या नात्यावर खूप विचार करून हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात आम्ही तीन मुलांना वाढविले. तसेच जगातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली आहे. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे म्हणून आम्ही घटस्फोटानंतर काम करणे सुरूच ठेवू, असेही दोघांनी स्पष्ट केले आहे.
बिल गेट्स यांचा प्रवास
बिल गेट्स आणि त्यांचे बालपणाचे मित्र पॉल अॅलनसोबत मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली. १९८० मध्ये मायक्रोसॉफ्टने आयबीएमसोबत एकत्र येऊन ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली. नंतर ही सिस्टिम एम एस डॉस या नावाने ओळखली गेली. २०१८ मध्ये पॉल यांचे निधन झाले. १९८६ मध्ये मायक्रोसॉफ्ट खर्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचली. वयाच्या ३१ वर्षी बिल गेट्स जगातील अब्जपती बनले. गेट्स २००० पर्यंत कंपनीचे सीईओ होते. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापना केली. गेट्स संपूर्ण वेळ संस्थेच्या कामासाठी देतात. याचाच भाग म्हणून त्यांनी भारतासह जगातील अनेक देशांना भेटी दिल्या असून, तेथील प्रश्न समजून घेतले आहेत.
https://twitter.com/BillGates/status/1389316412259270657