नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय रेल्वे म्हणजे देशाची रक्तवाहिनी होय, देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात प्रवाशांना व्यवस्थित पोहोचविण्याचे काम रेल्वे मार्फत करण्यात येते, याकरिता लाखो कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात. परंतु यामध्ये थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर रेल्वे अपघात घडण्याची शक्यता असते. रेल्वे अपघात होऊ नये म्हणून अनेक मोठ्या स्टेशनवर रेल्वे इंजिन आणि डब्यांची कसून तपासणी करण्यात येते, परंतु त्यात त्रुटी राहिल्यास अपघात घडून येतो. असाच अपघात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसला अपघात झाला. ठराविक वेगाने धावणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनखाली लावलेली ट्रॅक्शन मोटर घसरल्याने ट्रेन रुळावरून घसरली. त्यानंतर रेल्वे बोर्डाने सर्व लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटना ट्रेन चालवण्यापूर्वी इंजिन मॅन्युअली तपासण्याच्या सूचना दिल्या.
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील डोमोहनीजवळ हा अपघात घडला. अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे. तर ३६ प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रोलिंग स्टॉक व इंजिन-कोच-कंपार्टमेंट मध्ये एक वेळबद्ध फिटनेस तपासणी असते. बिकानेर एक्स्प्रेसचे इंजिन संबंधित लोको शेडमध्ये म्हणजे जेथे इंजिन दुरुस्ती आणि देखभाल होते, तेथे योग्यरित्या तपासले गेले नाही. याला लोको शेडचे अभियंते जबाबदार आहेत. मात्र, रेल्वे अपघाताचे नेमके कारण रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या चौकशीनंतर कळेल. यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी ट्रॅक आणि दुरुस्तीच्या कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी तपासणी ट्रॉलीची पाहणी केली. यानंतर क्रॅश झालेल्या इंजिनचे बारकाईने निरीक्षण केले. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी रेल्वे अपघात इंजिन उपकरणातील बिघाडामुळे झाला. त्याचा तपास सुरू असून खरे कारण लवकरच कळेल. यावेळी त्यांनी लोकोमोटिव्हच्या अंडरफ्रेम आणि ब्रेकिंग सिस्टमची देखील कसून तपासणी केली.
रेल्वे बोर्डाच्या अहवालात बिकानेर एक्स्प्रेसचा इंजिनखाली लावलेली ट्रॅक्शन मोटर घसरल्याने अपघात झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यापुढे लोको पायलटांनी अपूर्ण फिटनेसचे इंजिन चालवण्यास नकार द्यावा, असे निर्देशात म्हटले आहे. इंजिनची जबाबदारी घेताना, इंजिनची कालबद्ध फिटनेस तपासणी झाली आहे की नाही? हे पाहण्यासाठी लोको पायलट फिटनेस प्रमाणपत्र तपासावे.
रेल्वेने सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांना 25-25 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच या रेल्वे अपघातातील गंभीर जखमींना राजस्थान सरकार एक लाख रुपये आणि सामान्य जखमींना 50 हजार रुपये देणार आहे.