इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या राजस्थानमध्ये बिपोरजॉय या वादळाने थैमान घातले आहे. या वादळामुळे लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. वादळाचा आणि पावसाचा वेग इतका जास्त आहे की काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रति तास १५० किमी पेक्षा अधिक वेगाने वारे वाहत आहेत. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक जिल्ह्यात प्रचंड संकट निर्माण झाले आहे.
राजस्थानच्या जालोर, सिरोही आणि बाडमेर जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून याठिकाणी नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यात या वादळाचे चार बळी गेले असून यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. उत्तर गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. बिपोरजॉयचा प्रभाव कमी झालेला असला तरीही या पावसाने नागरिकांचे हाल केले आहेत.
बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे गुजरात सीमेजवळ नर्मदा नदीवरील एक कालवा फुटल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सांचौर शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पिंडवाडा, अबू रोड आणि रेवारमधील जवळपास सगळीच मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरलेली आहेत.
बाडमेर जिल्ह्यात तलावात बुडून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला असून राजसमंदजवळ दरड कोसळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याच जिल्ह्यात एका महिलेचा घराचे छत कोसळून मृत्यू झाल्याची घटना नोंदविण्यात आली आहे. बाडमेरसह बांसवाडा, उदयपूर, कोटा, अजमेर, सिरोही, जोधपूर या जिल्ह्यांना देखील वादळाचा आणि पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.