इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘साली आधी घरवाली’ ही म्हण आपण ऐकली आहे. बरेचदा बायकोला घटस्फोट देऊन साळीसोबत संसार थाटल्याच्या घटनाही आपल्या बघितल्या आहेत. मात्र बिहारमध्ये ‘साली पुरी घरवाली’चा प्रकार घडला आणि या अनोख्या लग्नाची सध्या संपूर्ण देशभर चर्चा आहे.
बिहारमधील छपरा जिल्ह्यातील ही घटना आहे. बिहारचे नाव निघाले तरी चित्र विचित्र घटनांचा पटच मांडता येईल एवढ्या घटना आहेत. पण आता जी घटना घडली आहे, ही अधिकच विचित्र आहे. दोन कुटुंबांमध्ये सोयरिक ठरली. नवरदेवाकडची मंडळी वऱ्हाड घेऊन नवरीच्या मांडवात पोहोचली. लग्नाचा विधी सुरू झाला. नवऱ्याने नवरीच्या गळ्यात वरमाला घातली. बँडबाजा वाजू लागला. जोरजोराने गाणी वाजू लागली. अभिनंदनाचा आणि अक्षतांचा वर्षाव होऊ लागला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. वरमाला घातल्यानंतर लग्नाच्या पुढच्या विधींना वेळ होता.
दरम्यानच्या काळात सगळी मंडळी जेवायला बसली. गोड धोड जेवणाने सर्व मंडळी तृप्त झाली आणि अचानक काही वेळाने चित्र बदलले. मांडवातील प्रत्येक जण टेंशनमध्ये होता. आता पुढे काय होईल, याचा विचार करू लागला. हे सारे एका विचित्र डिमांडमुळे घडले. आणि ही डिमांड नवरीच्या लहान बहिणीकडून आली. सप्तपदीच्या आधी नवरीच्या लहान बहिणीने चक्क नवरदेवासोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला. आता मोठी पंचाईत झाली.
सुरुवातीला सर्वांना बालहट्ट वाटला. पण नवरीची लहान बहीण ऐकायलाच तयार नव्हती. तिने थेट छतावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. आणि शेवटी मोठ्या बहिणीला वरमाला घालणाऱ्या नवरदेवाने लहान बहिणीसोबत सात फेरे घेतले.
वऱ्हाडाला मारहाण
लहान बहिणीने घराच्या आतून नवरदेवाला फोन केला आणि मीच तुमच्यासोबत लग्न करेन नाहीतर जीव देईन अशी धमकी दिली. त्यानंतर नवरीकडच्यांनी मुलाकडच्या संपूर्ण वऱ्हाडाला एका ठिकाणी बंदी केले आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्हीकडच्यांना समजावले. शेवटी लहान बहिणीसोबत लग्न करणे हाच पर्याय असल्याचा निष्कर्श काढण्यात आला.
Bihar Wedding Ceremony Story Shocking Decision