इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारच्या विवाह सोहळ्यांमध्ये होणाऱ्या घटना संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय असतात. मागे एका गावातील लोकांनी विवाहित मुलीचे प्रेमप्रकरण पकडले आणि तिचे जुन्या मित्रासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले. एका प्रकरणात नवरदेवाचा घो़डा लग्नस्थळी पोहोचण्यापूर्वी दुसऱ्याच मार्गाने निघून गेला. त्यामुळे लग्न तुटले. आता सारणा येथे आणखी एक जबरदस्त घटना घडली आहे. नवरा मुलगा रडल्यामुळे होता होता लग्न राहून गेले आहे.
सारणा येथे मोतीलाल यांचा मुलगा प्रशांत याच्या लग्नाची वरात वधूच्या घरी पोहोचली. दोन्ही कुटुंब गडगंज श्रीमंत असल्यामुळे खर्चाचा काही हिशेबच नव्हता. सजावट असो वा खाण्याच्या पदार्थांमध्ये असो कुठेही तडजोड करण्यात आली नव्हती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. लग्नासाठी दोन्हीकडचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. लाडक्या लेकीचे लग्न असल्यामुळे गावातील लोकही मोठ्या प्रमाणात हजर होते. पण एक छोटासा प्रसंग घडला आणि नवरा मांडवातच ढसाढसा रडायला लागला. तेवढ्या एका कारणाने नवरीने लग्नासाठी नकार दिला आणि चांगलाच गोंधळ उडाला. नवऱ्याची मानसिक अवस्था बरोबर नाही, मला याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत लग्न करायचे नाही, असे नवरीने ठणकावून सांगितल्यामुळे सारेच गणीत बिघडले. लोकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. त्यानंतर मुलीकडच्यांनी नवरदेवाला दिलेल्या सर्व वस्तू आणि केलेला आहेर परत मागितला. तेव्हा तर चांगलाच गोंधळ उडाला. परिणामी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण सोडवावे लागले. शेवटी नवरदेव लग्न न करताच घरी परतला.
मैत्रिणींनी चिडवले
नवरदेव आणि नवरी मांडवात उभे होते. आता दोघेही एकमेकांना वरमाला घालणार होते. पण त्याचवेळी नवरीच्या मैत्रिणींनी नवरदेवाला चिडवले. या चिडवण्यामुळे नवरदेवाच्या चेहऱ्यावचे हावभाव बघून तिच्या मैत्रिणींना हसायला आले. आणि त्यांनी नवरा मुलगा बुद्धू आहे, मंदबुद्धी आहे, असे चिडवायला सुरुवात केली. त्यामुळेच नवरदेवाला ढसाढसा रडायला आले आणि जागीच लग्न तुटले.