इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परंतु आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये अशी अनेक मुले आहेत की त्यांना शिक्षण मिळत नाही, इतकेच नव्हे तर त्यांना कोणी शिकवण्यासाठी देखील तयार होत नाही. परंतु बिहारमध्ये एका लहान बालकाने मुलांना शिकविण्याचे कार्य हाती घेतले, त्याच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे अकरा वर्षीय मुलगा सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिकवतो या कार्यात आपल्याला मुख्यमंत्र्यांनी मदत करावी अशी त्याची अपेक्षा आहे. या संदर्भातील त्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. सध्या बिहारचा एक सोनू नामक बालक इंटरनेटवर चर्चेत आहे. या सोनूचे दोन व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. एक व्हिडिओ सीएम नितीश कुमार आणि दुसरा तेज प्रताप यांच्यासोबतचा आहे. सोनू हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील निमा कोलचा रहिवासी आहे. सोनू अलीकडेच नितीश कुमार यांना भेटून अभ्यासात मदत करण्याचा आग्रह करत प्रसिद्धीझोतात आला.
सोनूने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि बिहारचे शिक्षण आणि दारूबंदी दोन्ही अपयशी असल्याचे म्हटले. तेव्हापासून ते सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. इयत्ता सहावीत शिकणारा 11 वर्षांचा सोनू 30 विद्यार्थ्यांना शिकवणी देतो आणि शिकवणीतून महिन्याला सुमारे 3 हजार रुपये कमावतो. सोनूला अभ्यासाची इतकी आवड आहे की तो त्याच्या लहान विद्यार्थ्यांपासून त्याच्या वयाच्या विद्यार्थ्यांना गावातच शिकवतो.
विशेष म्हणजे अभ्यासामुळे त्याने आपली कैफियत मांडली आणि ती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापर्यंत पोहोचली. सोनूने हात जोडून मुख्यमंत्र्यांना सांगितले की, सर मला अभ्यासासाठी मदत करा, माझे वडील मला शिकवू इच्छित नाहीत.
दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी सोनूला व्हिडिओ कॉल केला. त्यात सोनू तेजला विचारतो, ‘सर, तुम्ही आमच्या गावात कधी येताय? यावर तेज प्रताप म्हणतो, ‘तुम्ही हाक मारल्यावर मी येईन, तू खूप धाडसी मुलगा आहेस. आम्ही तुमचे चाहते झालो आहोत. तू माझ्या बिहारचा तारा आहेस. यानंतर तेज प्रताप सोनूला सांगतात, जेव्हा आपण सरकारमध्ये येऊ तेव्हा आयएएस होऊन माझ्या हाताखाली काम करायला हरकत नाही. यावर सोनू सांगतो की मी कोणाच्याही हाताखाली करणार नाही. सोनूच्या या धाडसी विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.