इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – परदेशात उच्च शिक्षण घेणे हे बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परदेशात शिक्षणासाठी प्रचंड खर्च येतो, तो प्रत्येक पालकाला भेटणे शक्य नसते. पण असे काही विद्यार्थी आहेत ज्यांची प्रतिभा देश-विदेशात पोहोचते. त्यातच सध्या एका हुशार विद्यार्थ्याची आगळी वेगळी कहाणी समोर आली आहे.
बिहारमधील गोनपुरा या छोट्याशा गावातील रोजंदारी मजुराचा मुलगा प्रेम कुमार याला अमेरिकेच्या प्रतिष्ठित लाफायेट कॉलेजमधून 2.5 कोटींची शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रेम कुमार यांना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. प्रेम हा भारतातील पहिला विद्यार्थी आहे ज्याने ही कामगिरी केली आहे. लाफायेट कॉलेज हे अमेरिकेतील नामांकीत 25 महाविद्यालयांपैकी एक आहे.
प्रेम कुमार ( वय 17 ) त्याने यंदा बारावीची परीक्षा दिली. प्रेम कुमारचे आई, वडील हे कधीही शाळेत गेलेले नाही, त्यांनी शाळा पाहिलेली नाही. पण लेकाला मात्र आता पुढील शिक्षणासाठी थेट अमेरिकेतील प्रतिष्ठीत महाविद्यालयात शिक्षण्याची संधी मिळाली आहे. कॉलेजला जाणारा प्रेम कुमार हा त्याच्या कुटुंबातील पहिला सदस्य असेल. सध्या तो शोषित समाधान केंद्रात बारावीचे शिक्षण घेत आहे. अमेरिकेत प्रेम चार वर्षे मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करेल.
या शिष्यवृत्ती अंतर्गत, शिक्षणापासून राहणीमानापर्यंतच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च, शिक्षण शुल्क, आरोग्य विमा या सर्वांचा समावेश केला जाईल. जगभरातून एकूण 6 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. डायर फेलोशिप असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे. या अंतर्गत जगातील कठीण समस्या सोडवण्याची आंतरिक प्रेरणा आणि वचनबद्धता असलेल्या निवडक विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. त्यातल्या एका बिहारच्या प्रेमाचंही नाव आहे.
प्रेमची ओळख डेक्सटेरिटी ग्लोबल या राष्ट्रीय संस्थेने केली आहे आणि त्याला डेक्सटेरिटीने प्रशिक्षण दिले आहे. ही संस्था मागासवर्गाच्या मुलांसाठी काम करते. प्रेम कुमार हा पाच बहिणींचा प्रेम हा एकुलता एक भाऊ आहे. प्रेमच्या या यशानंतर एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या यशामागे प्रेमची मेहनत आणि जिद्द आहे. प्रेमला कोणतीही सुविधा नव्हती. त्याचे घरही झोपडीसारखे आहे. आता प्रेम अमेरिकेतील एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकणार आहे.
Bihar Prem Kumar Landless Laborer Son got 2.5 Crore USA Scholarship