इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमध्ये भाजपच्या १६ मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने नितीश कुमार यांचे सरकार कोसळले आहे. आज दुपारी नितीश कुमार हे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना देणार आहेत. नितीश कुमार हे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या माध्यमातून नवे सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नितीश यांचे सरकार पहिल्यांदाच कोसळलेले नाही. नितीश कुमार यांचा आजवरचा इतिहास पाहिला तर ते स्पष्ट होते. तो नेमका काय आहे हे आपण आता जाणून घेऊया..
नितीश कुमार पुन्हा राजद आणि काँग्रेस सोबत गेले तर २०१७ नंतर जदयू (जनता दल युनाटेड) पुन्हा एकदा लालूंच्या राजदसोबत हातमिळवणी करेल आणि राजदसोबतच्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होईल. नितीश कुमार यांनी दगा देण्याची बिहारच्या राजकारणातली ही पहिली वेळ नाही तर तब्बल ही पाचवी वेळ असणार आहे. नितीश कुमार भाजपाला कधीही दगा देऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. यापूर्वीदेखील त्यांनी चार वेळा सत्ता परिवर्तन घडवून आणलं आहे. पुन्हा एकदा हेच घडलं तर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचेच दिसून येईल.
असा आहे रंजक इतिहास..
नितीश कुमार १९९० मध्ये बिहारच्या राजकारणात चर्चेत आले. तत्कालीन जनता दलात त्यांनी लालू प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री बनण्यात मदत केली. नितीश कुमार यांनी १९८५ मध्ये हरनौत मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा जिंकली. चार वर्षानंतर १९८९ मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली. १९९१ मध्ये मध्यावधी निवडणुकीत पुन्हा निवडणूक जिंकली. १९९४ मध्ये जनता दलात लालू प्रसाद यादवांविरोधात बंड केलं. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी काढली. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात समता पार्टी आणि शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल (युनायटेड) चे विलीनीकरण झाले.
१६ जून २०१३ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणूक प्रचार मोहिम समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले तेव्हा नितीश कुमार नाराज झाले. त्यांनी भाजपसोबतची १७ वर्षांची युती तोडली. बिहारच्या युतीत बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याची टीका त्यांनी त्यावेळी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केली होती. २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत आणखी मोठी घडामोड झाली. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महाआघाडी केली. जदयू आणि राजदने १०१ जागांवर निवडणूक लढवली. ८० जागांवर विजय मिळवला. जदयूने ७१ जागांवर ताबा घेतला. नितीश कुमार महाआघाडीचे नेते बनले आणि पाचव्या वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२६ जुलै २०१७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला. तेव्हाचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेजस्वी यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली होती. नितीश कुमारांवरही दबाव आला. त्यांनी सरकारमधून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जदयूने भाजप आणि मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता नेमके काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bihar Politics Nitish Kumar History Alliance