पाटणा (बिहार) – वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान हे आणखी अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर चिराग यांना आता पक्षांतर्गत मोठ्या धक्क्याला तोंड द्यावे लागत आहे.
लोकजनशक्ती पार्टीच्या (एलजेपी) पाच खासदारांनी पार्टी प्रमुख खासदार चिराग पासवान यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एलपीजीमध्ये ही सर्वात मोठी फूट असल्याचे बोलले जात आहे. एलपीजीचे प्रमुख रामविलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस पासवान यांची लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाचही खासदारांनी पत्र लिहून याबाबत माहिती दिली. एलपीजीपासून वेगळी मान्यता द्यावी अशी मागणी पाचही खासदारांनी केली आहे. असे झाल्यास चिराग पासवान यांच्यासमोर बिहारमध्ये राजकीय आव्हान निर्माण होणार आहे.
लोकजनशक्ती पार्टीमधून बाहेर पडणार्या खासदारांपैकी पशुपती पारस पासवान (काका), प्रिंस राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर यांचा समावेश आहे. चिराग पासवान आता एकटेच राहिले आहेत. आदी चार खासदारांनी विभक्त होण्याची बातमी आली होती. मात्र पशुपती पारस पासवान यांच्या नेतृत्वाखाली ही फूट पडली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा विचार मोदी सरकार करत असताना हा निर्णय झाला आहे. पंतप्रधान कॅबिनेटमध्ये बदल करू शकतात. दुसरीकडे संयुक्त जनता दलातही संघर्ष सुरू झाला आहे. एनडीएमध्ये जेडीयूचे १६ खासदार आहेत. गेल्या वेळी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान जेडीयूचा सहभाग होण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु शेवटपर्यंत काहीच होऊ शकले नाही. एलपीजीमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.
जेडीयूमध्ये प्रवेशाची शक्यता
पाच खासदार जेडीयूमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हे सर्व खासदार बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान चिराग पासवान यांच्याशी नाराज होते. तेव्हापासूनच एलपीजीमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता त्यांनी निर्णय घेतल्याने एलपीजीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
बिहारमध्ये विधानसभेत लोजपा शून्यावर
बिहारमध्ये एनडीएमधून वेगळे होऊन निवडणूक लढणार्या लोजपाला फक्त एकच जागा मिळाली होती. नंतर लोजपाचे आमदार राज कुमार सिंह यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला. आता बिहार विधानसभा किंवा विधान परिषदेत एकही आमदार नाही.